Kalidas Jayanti Mini mailfil

नमस्कार रसिक मंडळी,
समस्त सिडनीकरांना ‘कालिदास जयंती -२०१६’ च्या नवीन कमिटी सदस्यांकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा! अर्थातच नवीन वर्ष सुरु होऊन एक महिना होऊन गेला, पण नव्या वर्षाची नवीन नव्हाळी या ग्रीष्मातही टवटवीत राहावी … … हीच मनापासून ईच्छा!
ग्रीष्म्याने तप्त झालेल्या सिडनीकरांना शीतलता देऊन गेल्या या पर्जन्यसरी … अन् लक्षात आलं की हीच वेळ आहे, तुम्हां-आम्हां सर्वांमध्येच दडलेल्या कालिदासाला परत एकदा साद घालायची …. ” चला, लिहिते व्हा !” मान्य आहे आम्हालाही की अखिल भारतीय मराठी संमेलन आणि अशा अनेक कार्यक्रमामध्ये तुम्ही गुंतला आहात. पण तरीही गेली कित्येक वर्षे सातत्याने खुलणारी ‘कालिदास जयंती’ -आपल्या सर्वांच्याच मराठी साहित्यावरच्या निस्सीम प्रेमामुळे बहारदार होत आहे. यावर्षीही हा कार्यक्रम अजून रसाळ, गोमटा व्हावा ही ईच्छा आपल्यातल्या प्रत्येक लेखक-कवी मनांची अन् दर्जेदार साहित्याला मनापासून दाद देणाऱ्या चोखंदळ श्रोतृवर्गाचीसुद्धा!
चला तर, आता वेळ नका दवडू.आपापले की-बोर्ड / लेखण्या पाजळा. शनिवार,दि. ५ मार्च २०१६ रोजी आपली मिनीमैफिल होऊ घातलीय. काहीतरी लिहू इच्छीणाऱ्यांची उपस्थिती अगदी आग्रहाची!
“काहीतरी लिहावसं वाटतं, पण विषयच सुचत नाहीय. ” अहो, हा प्रश्न फक्त तुमचाच नाही तर अगदी आमचासुद्धा आहे हं ! काय बरं लिहिता येईल ? मनाला भिडलेल्या एखाद्या प्रसंगाचं खुसखुशीत वर्णन…. एखादं व्यक्तिचित्रण , मग ते अगदी आपल्या आई-वडिलांचं, नावाजलेल्या आदर्शांचं किंवा ऑफिसमधल्या एखाद्या खट सहकाऱ्याचं … ! ऑस्ट्रेलिया, भारत किंवा अन्य कुठच्याही देशात कामासाठी किंवा मनोरंजनासाठी केलेली भ्रमंती आठवा. काही मजेशीर अनुभवाचं पाल्हाळीक वर्णन … काही खास अनुभव … एखाद्या मराठेतर भाषेतली भावलेली कविता, गाणं , लेख यांचा स्वैर भावानुवाद … एखादा पाहिलेला कुठच्याही भाषेतला चित्रपट, वाचलेलं पुस्तक याबद्दल काही मांडावसं वाटतंय ? स्वत:च्या विचारांच्या स्वरुपात किंवा स्वैर अनुवाद, अगदी खुमासदार परीक्षणस्वरुपात सुद्धा चालेल. एखादं विडंबन , विनोदी लेखन , वात्रटिका … तुम्ही लिहिलेल्या ! किंवा सद्य परिस्थितीवर आधारलेल्या, तुम्ही रचलेल्या ओव्या … चारोळ्या. मंडळी, मागणं एकच …. फक्तं लिहिते व्हा …. तुम्हां लेखक-कवींसाठी कालिदास जयंतीच व्यासपीठ अन जाणकारांचे कान सदैव आतुर आहेत…. जाता जाता मिनीमैफिलीबद्दल थोडंस ! मिनीमैफिल म्हणजे जुन्या-नव्या लेखक-कवीची एक छोटेखाणी मैफिल. आपापली रचना सादर करण्याची, लिखाणाविषयी, त्याच्या सादरीकरणाबद्दल घरेलू वातावरणात विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी. तेव्हा रसिक लेखकु-कवी मंडळींकरता परत एकदा आग्रहाचं आमंत्रण. शनिवार, दि. ५ मार्च २०१६ रोजी रोजी होणाऱ्या मिनीमैफिलीकरता. ठिकाण व वेळ लवकरच कळवू.
आपल्या ओळखीतल्या, जवळच्या, लांबच्या सर्व लेखक-कवी मंडळींकरता हे आमंत्रण आवर्जून पोचतं करा.
कळावे, लोभ आहेच, तो वृद्धींगत व्हावा हीच विनंती,
आपली कालिदासजयंती २०१६ कमिटीस्वाती
भागवत (0430 046 737), उमेष थत्ते (0468 580 600), शांभवी कुलकर्णी (0400 481 929), वीणा कुलकर्णी (0419 361 850)